मी 'न' केलेला संकल्प
मी न केलेला संकल्प म्हणजे लग्न. बहिणीच्या लग्नांनंतर घरच्यांनी माझ्या लग्नासाठी तलवारी उपसल्या आहेत. मग राहतो प्रश्न माझा म्हणजेच माझ्या तयारीचा. मावशी आणि भावडांचे टोमणे एव्हाना कानावर पडू लागलेत. कालच बहीणीची मैत्रिणच म्हणाली 'तुझी हमखास गर्लफ्रेंड असणार?' पण गर्लफ्रेंड सारख्या प्राण्यांपासून चार कोस दूरच राहल्यामुळे असे प्रश्न मी निव्वळ 'हसण्यावरच' तोलवतो.
लग्न आता करावे का? ह्या प्रश्नाबाबत मी ही तसा जरा गोंधळात अाहे. जॉब चे तीन-तेरा आणि भविष्यातली माझी वाटचाल थोडीफार मी ओळखून आहे. अभियांत्रिकी आणि कला यांचा तोल सांभाळताना संसाराचा गाडा ओढणे जिवावर येईल ह्याचं ही तितकचं दडपण.
लग्नासाठी आयडीयल वय असल्याकारणाने 'तू तर सेटल आहे' असे म्हणून घरच्यांनी नाटकाची नांदी गायची सुरूवात केलेली आहे. घरचे कमी पडतायत म्हणून कि काय हल्ली शेजाऱ्यांनी माझ्या लग्नाचे लग्नाचे 'शिवधनुष्य' पेलले आहे. मित्राच्या आईने तर हद्दच केली माझ्या बायोडाटाची heard copy (कागदाची कॉपी असते ती हार्ड कॉपी आणि फक्त ऐकीव माहीतीच्या आधारावर समोरच्याला वदली किंवा समोरच्यावर लादली जाते ती heard copy असते, असा माझा वैयक्तिक शोध आहे. आणि ह्या शोधाचे सर्व हक्क माझ्याकडेच आहेत) एका पोरीसमोर वाचून दाखवली आहे. असो.
घरी चाललेले प्रयत्न आणि माझा हा न केलेला संकल्प ह्यामुळे घरात घरगुती शीत युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून पेटलेले युद्ध आणि चाल करून आलेला गनिम कितीही टप्प्यात असला तरी तोफांना बत्ती देणे मी तुर्तास टाळलेले आहे...
Comments
Post a Comment