दिवा-सावंतवाडी पेसेंजर

सहा तासात गावात म्हणून काय ती 'जनशताब्दी' ने प्रवास करायची सवयचं जडली होती. आगाऊ आरक्षण करून प्रवास, म्हणजेच दोन महिन्यापूर्वीपासून प्लानिंग लागतं. त्यात म्हणजे एखादा कोकणातला पारंपारीक गणपतीचा सण असला म्हणजे तुमचं प्लानिंग आणि नेट स्पीड तगडं असावं लागतं. हे झालं सर्व आरक्षित रेल्वेसंदर्भात.

आणि आज नेमकी कुठलही प्लानिंग नसताना कोकण रेल्वेने प्रवास करायची वेळ आली आणि ती ही सावंतवाडी-दिवा पेसेंजरने. एव्हाना तुमच्या कपाळाला आठ्या आल्या असतीलचं, नसतील आल्यातर तुम्ही कोकणात राहता ह्याबाबत शंका व्यक्त केली जाईल.

जेमतेम पाच वर्ष झाली असतील सांवतवाडी-दिवा पेसेंजरने प्रवास करून. त्यातली असणारी वर्दळ भरपूर मिस केली. सकाळी 9.21 ची तिची कणकवली फलाटावर येण्याची वेळ. लेट येणाऱ्या गर्लफ्रेंडप्रमाणे ती आजही 1 तास लेट झाल्याने तिचा पारंपारीकपणा तिने यथायोग्य जपला होता. लेट झालातरी तिने आम्हाला तिच्यात सामावून घेतलं. 31st मुळे कोकणाकडे होणारे परकीय आक्रमण लक्षात घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारे लोक तितकेशे कमीच असणार ह्याबद्दल पूर्वकल्पना होती. आत शिरलो आणि सीटही भेटली. हि गोष्ट खूपच रेअर आहे. 'छोट्या शहरात अशा मोठ्या गोष्टी होतच राहतात' म्हणत कोकण रेल्वेचा प्रवास सुरू झाला.

फेरीवाल्यांच्या फेऱ्या एव्हाना सुरू झाल्या होत्या. कोकण स्पेशल चिवडा आणि मालवणी खाजाने सलामी दिली. दिवा ट्रेनची खासियत सांगायचं झालं तर वेळेनुसार ह्यात हंगामी खाद्यपदार्थाची विक्री होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे कणकवली ते रत्नागिरी दरम्यान तुम्हाला चिवडा आणि खाजा हे पदार्थ जास्त दिसतात. रत्नागिरीत गाडी दाखल झाल्यावर हे सगळे गायब होतात त्यांची जागा हि वडापाव व समोसा ह्याने घेतलेली असते ते अगदी चिपळूण पर्यंत. चिपळून पासून पुढे तुम्हाला वरायटी पाहायला मिळेल. भेल, काकडी, भजी, आंबावडी, थंडा वैगेरे वैगेरे. शेवटी भाजी देखील मिळेल. खेडच्या दरम्यान फापडा विकणारे मामा आज दिसले नाहीत आणि 'बटाट्याचं' विकणारे बाबा ही दिसले नाही. कमालीची मार्केटींग स्ट्रटर्जी असणारे ह्या दोघांपुढे कालेजात मार्केटींग शिकणाऱ्यांचा कधीच निभाव लागणार नाही हे ही तितकचं खरं आहे. ह्या सगळ्यात 'चहाचे' स्थान अढळ आहे. उर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार तिचे अस्तित्व नष्ट करता येणार नाही किंवा नाकारताही येणार नाही.

प्रवाश्यासंदर्भात बोलायचं झालं तर इथे 'पक्के' प्रवासी भेटतात. नाहीतर आरक्षित गाड्यात प्रवाश्यापेक्षा 'परवासी' जास्त आढळतात. वेटींगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाश्यांना अर्धे ढुंगण टेकवण्यापुरती ही जागा देणार नाहीत. पण दिवा ट्रेनमध्ये वेटींग वैगेरे काही नसतं तिथं फक्त थोडी सेटींग असावी लागते मग जागेचा प्रश्न भारतातल्या मोठाल्या scam प्रमाणे अलगद सोडवला जातो.

दिवा पेसेंजरचा निस्वार्थीपणा आजवरही तसाच कायम आहे. स्वत:कितीही जोरदार दौड केलीतरी कुठल्या ना कुठल्या अनोळखी फलाटावर थांबून मागे सुटलेल्या express गाड्यांना पुढे येऊ देण्याचा तिचा उदारपणा भाव खाऊन जातो. Indicatorच्या वेळेप्रमाणे न चालण्याचा तिचा निर्धार पक्का असतो. वेळेत केव्हाच न पोचल्याने लोकं हिला घरी पोहचल्यावर यथेच्छ शिव्याही घालतात, पण तसं असलं तरी केवळं शंभर रुपयाच्या नोटेत तुम्हाला जेमतेम साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास घडवून आणायचे तिचे सामर्थ्य अबाधित आहे. बऱ्याच घुसमटलेल्या आठवणींना आज ह्या प्रवासाने वाट मोकळी करून दिली.

हो आणि नुकतचं पेण गाठलयं तसा प्रवास अजून संपलेला नाही. पनवेलचा रात्री 7 वाजताचा वेळ नेहमीप्रमाणे पाळला नाही आणि मी ही तिच्यावर तसा रागावलो नाही. आज राहून नीट शेवट सापडत नाहीए बहुधा मी तिच्या प्रेमात पडलोय... आता खरचं जास्त लिहीणे नाही...

तूर्तास पेन डाऊन..

#कोकण_रेल्वे
#सावंतवाडी_दिवा_पेसेंजर
#50105_50106

Comments

Post a Comment

Popular Posts